मुंबई - भाजपने विधानसभा निवडणुकीत डावललेल्या विनोद तावडे (vinod tawde) गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. ती दूर करण्यासाठी भाजपने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी (national secretary of bjp) बढती देत पुनर्वसन केले आहे. तावडे यांच्या नियुक्तीमुळे भाजपला मुंबईत बळ मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (vinod tawde appointed as bjp national secretary)
नाराजी दूर करण्यास अयशस्वी -
2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. यानंतर गेल्या दोन वर्षांपासून भाजपच्या विविध कार्यक्रमांपासून नेहमीच अलिप्त राहिले. नुकत्याच झालेल्या राज्याच्या कार्यकारिणीतूनही तावडेंना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड नाराज होते. हरियाणाचे प्रभारी व राष्ट्रीय सचिव पदाचा कार्यभार सोपवून नाराजी दूर करायचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात, गरीब कल्याण योजनेचे समन्वयक या जबाबदाऱ्याही तावडे यांच्याकडे सोपवल्या. मात्र, भाजपचा हा डाव यशस्वी झाला नसल्याचे बोलले जाते.
हेही वाचा - Amravati Violence : फडणवीस यांचे आरोप बेजबाबदार, दोन्ही बाजूंच्या दोषींवर कारवाई करणार - यशोमती ठाकूर
मनधरणीसाठी खटाटोप -
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महापालिकेवर झेंडा फडकावण्याचे भाजपचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची सचिव पदावरून सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे. मुंबईच्या उपनगरात विनोद तावडे यांची मोठी ताकद आहे. तावडेंना डावलून भाजपला निवडणुकीला समोरे जाणे येथे परवडणारे नाही. त्यामुळेच मनधरणीसाठी भाजपने खटाटोप केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.