मुंबई - भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरून चांगलेच घेरले आहे. तसेच एनसीबीच्या कारवाईवर राजकारण करू नये, असेही म्हटले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “हे आधीपासूनच फसवे आहेत. नवाब मलिक हे मंत्री आहेत, तर मग त्यांच्या जावयाने काहीही करावे का? कायद्यानुसार कारवाई होत असेल, तर त्यात राजकारण कशाला आणता? आरोप गंभीर आहेत तर त्या दृष्टीने तपास करून कारवाई व्हायलाच पाहिजे. याबद्दल आमच्या दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलीय.”
“प्रत्येक वेळी विरोधाला विरोध करायलाच हवा का? पोलिसांना कारवाई करू द्या. त्यानंतर आम्ही बघू. भाजप विरोधक म्हणून कुठेही कमी पडत नाहीये. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे यावर फार काही बोलणार नाही,” असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.
20 हजार रुपये गुगल पेने पाठवले
नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा 'गुगल पे'द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावले होते.
एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटिश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.