मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी एक ट्विट करून त्यांनी हा दावा केला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले आहेत.
वादग्रस्त विधानासाठी कायम चर्चेत असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार आणि ध्येय वेगळे आहेत, यामुळेच त्यांच्यात कलह असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे जुलै महिन्यात भाजपचे निरज गुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सिंगापूरच्या सिटीझनशिप आणि इतर कंपनी व्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी केली होती, त्याचा मुद्दाही सुब्रमण्यण यांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित करत त्यांनी थेट पवार कुटुंबीयांवरच निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम यांच्या या ट्विटमधील आरोप आणि दाव्यांमुळे येत्या काळात राष्ट्रवादी विरूध्द भाजप असे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
पार्थ पवार यांनी केलेल्या काही विधानामुळे पवार कुटुंबीयांमध्ये कलह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयीची भूमिका स्पष्ट केली नाही. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाईल हे पाहावे लागणार आहे.