मुंबई - एनएसीएलमध्ये मोहित अगरवाल आस्था गृप आणि प्रताप सरनाईक यांच्या गृपने छोट्या गुंतवणुकदारांचे पैसे अडवून तब्बल 250 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. इतकेच नव्हे तर सरनाईक यांनी अनेक घोटाळे केले आहेत. 175 कोटींचा एमएमआरडीए घोटाळा, 250 कोटींचा एनएसीएल घोटाळा हा हजार कोटींपेक्षाही जास्त असू शकतो. म्हणूनच सरनाईक हे ईडीसमोर चौकशीला जात नाही आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार त्यांना वाचवत असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री योगींच्या मुंबई भेटीबाबत
गेल्या अनेक वर्षात विविध राज्यातील मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी उद्योगपतींसोबत चर्चा केली. असे कसे कोणी मुंबईतून बॉलिवूडला घेऊन जाईल, असा सवालही त्यांनी केला. मात्र, ठाकरे सरकार हे घाबरणारे सरकार आहे. मुंबईत येऊन लोक प्रेरणा घेऊन जातात, याचा आनंद व्हायला हवा. मुंबई नेहमी प्रगती करत पुढे जाणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार आणि उद्योगपतींची भेट घेतली. यावरुन ते बॉलिवूड उत्तरप्रदेशात घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा - 'शेतकरी प्रश्न, कोरोना लससाठी पंतप्रधानांना संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवावे'
योगींची प्रतिक्रिया -
बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले आहे. अशातच बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्म सिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटले होते. उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडामधील यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी होईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. मुंबई फिल्म सिटी आपले काम करेल. यूपीतील नवी फिल्म सिटी त्यांचे काम करेल, असेही योगी यावेळी म्हणाले होते.