मुंबई - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. आता त्यानंतर किरीट सोमैया यांनी यासंदर्भात 2 हजार 700 पानांचे पुरावे ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयात जाऊन सुपूर्द केला आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली असल्याची माहितीही स्वतः किरीट सोमैया यांनी पुरावे सादर केल्यानंतर दिली आहे. त्यामुळे आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय केले होते आरोप..?
भाजप नेते किरीट सोमैया यांनी सोमवारी (दि. 13 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ कुटुंबीयांवर आरोप केले होते. ते म्हणाले, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे.
शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले
निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 3 लाख 78 हजार 340 शेअर्स आहेत. 2003 ते 2014 या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले असल्याचे आरोप किरीट सोमैया यांनी केले.
'या' कंपनीत जमा झालेल्या पैसे
या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा मरुभूमी फायनान्सकडून 15.90 कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून 35.62 कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपीकडून 4.49 कोटी, नवरत्न असोसिएट्सकडून 4.89 कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून 11.85 कोटी, माऊंट कॅपिटलकडून 2.89 कोटी रुपये जमा झाल्याचे आरोप किरीट सोमैया यांनी केले आहेत.
हेही वाचा - बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा किरीट सोमैयांना उद्योग - नवाब मलिक