मुंबई - घाटकोपरच्या असल्फा मेट्रो खाली गटारात पडून महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली. त्यासाठी आज सोमैया यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत काही वेळाने सोडून दिले.
काय होते प्रकरण -
घाटकोपर असल्फा येथून शितल भानुशाली ही महिला बेपत्ता झाली होती. मुंबईत आलेल्या मुसळधार पावसादरम्यान नाल्याचे झाकण उघड राहून त्यात ती पडल्याची भीती वर्तवण्यात येत होती. त्यामुळे असल्फा मेट्रोखाली आणि आजू बाजूच्या परिसरात असलेल्या गटारात शोधकार्य सुरू होते. मात्र, मुंबई महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीसांना त्यात यश मिळाले नाही. तीन दिवसांनी 4 ऑक्टोबरच्या रात्री ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाजीअली येथील समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह आढळला.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप भाजपा व महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, कारवाई न झाल्यामुळे किरीट सोमैया यांनी आज आंदोलन केले. आंदोलन करताना वेळेची मर्यादा असल्यामुळे पोलिसांनी किरीट सोमैया यांना ताब्यात घेतले. यानंतर किरीट सोमैया यांनी त्या महिलेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.