मुंबई - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि शरद पवारांवर निशाणा साधला.
'दिल्लीच्या कालच्या घटनेत पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आले, तेव्हा त्यांच्याविरोधात चकार शब्द कोणी काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. तर, कधीकाळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे, त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंड आता का शिवली आहेत? असा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्यावतीने विचारत आहोत,' असे आशिष शेलार म्हणाले.
आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांचे आता तोंड का बंद?
आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. शेलार यांनी खासकरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार, संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आता का शिवली?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला.