मुंबई - गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी लगेचच सुरू होते. विशेषत: देवीच्या मूर्ती बनविण्याची सुरुवात तातडीने केली जाते. पण अद्याप सरकारने याबाबत काही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या गाईडलाइन वेळीच जाहीर करा, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आशिष शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
कोरोनामुळे गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकार व कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. मूर्तींची उंचीबाबत स्पष्टता येण्यास विलंब झाल्याने कारखान्यात 4 फुटांपेक्षा उंच असलेल्या मोठ्या मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. तसेच कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मूर्तिकारांना त्याचा फटका बसला. पेणमधील दोहे, हमरापूर, केळवे यासारख्या मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे मूर्तिकार आणि कारखाने असलेल्या गावांना गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बहुसंख्य तेच मूर्तिकार त्याच कारखान्यात पुन्हा देवीच्या मूर्ती घडवित असल्याने त्यांना वेळीच सरकारने स्पष्टता देण्याची गरज आहे.
मुंबई शहरात देवीच्या मूर्ती घडविणारे सुमारे 5 हजार मूर्तिकार व कारखाने आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मूर्तिंच्या उंचीबाबत प्रश्न चिन्ह आहे. मूर्तिकार ही एक छोटी इंडस्ट्री असून त्यावर हजारो मूर्तिकार, कामगार, कारागीर यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाची झळ जशी अन्य उद्योगांना बसली तशीच झळ याही उद्योगांना बसली आहे. आपण त्यांना वेळीच स्पष्टता दिल्यास त्या उद्योगाचे होणारे नुकसान टळू शकेल. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की, गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्री उत्सवाच्या नियमावलीचा शासन निर्णय वेळीच घ्यावा. किंबहुना तातडीने त्याबाबत संबंधितांची बैठक घेऊन शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी शेलारांनी केली आहे.