मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी बोलताना त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधत बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे, मुंबई केले. याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे. आता कुठे गेले मराठी प्रेम? असा सवाल करत, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेटीचा भाजप मुंबईच्या ट्विटर हँडलवरून खरपूस समाचार घेतला आहे.
खलिस्तानवाद्यांचे समर्थन करणारे केजरीवाल: अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केला होता. नेहमी बेगडी प्रेम दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. आता खलिस्तानवाद्यांचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्याला भेटतात. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न कदाचित यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही या निमित्ताने होत आहे.
काय म्हणाले होते केजरीवाल? उद्धव ठाकरे हे सध्या भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतवसिंग मान हे उद्धव ठाकरे यांना भेटले. या तिघांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याप्रसंगी बोलताना केजरीवाल म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. जरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी उद्धव ठाकरे हे वाघच राहतील. सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळेल, अशी शक्यताही केजरीवाल यांनी काल व्यक्त केली होती. पुढे बोलताना केजरीवाल यांनी आम्ही जनतेचा, त्यांच्या समस्यांचा, बेरोजगारीचा विचार करतो. पण देशात असा एक पक्ष आहे की, जो फक्त निवडणुकीचाच विचार करतो, असे सांगत भाजपवर निशाणा साधला होता. या कारणास्तव आता भाजपनेही केजरीवाल यांच्या बॉम्बे शब्दाचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
केजरीवाल, मान आणि ठाकरे भेट: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि हे नाते आता आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे केजरीवाल यांनी भेटीनंतर सांगितले. भेटीनंतर मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे शेर: निवडणूक आयोगाच्या निकालावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरीला गेले आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. आणि उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र आहेत. म्हणून शेर का बेटा शेर होता असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना शेर म्हणून संबोधले आहे. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून देईल असेही ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंचे केले कौतुक: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले. आणि आम्ही कोरोना काळात महाराष्ट्राकडून अनेक गोष्टी देखील शिकलो.
देशात अनेक समस्या: मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, देशात अनेक सारे प्रश्न असताना देखील भाजप कायम निवडणूकीचा विचार करत असते. आम आदमी पक्ष हा देशातील बेरोजगार तरूणांचा, गृहणींचा आणि शेतकऱ्यांचा समस्याचा विचार करत असतो. म्हणून ज्यावेळी निवडणूका येतील तेव्हा निवडणूकांचा विचार करू असेही ते म्हणाले आहेत.