मुंबई - भाजपने माझ्यासोबत केवळ अन्याय नाही तर धोकेबाजी देखील केली. भाजपचे बंडखोर नेते व लोकसंग्राम संघटनेचे प्रमुख अनिल गोटे यांनी भाजपवर आरोप केला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी अनिल गोटे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी अनिल गोटे महाआघाडीमध्ये सामील होत असल्याची घोषणा केली. गोटे हे आघाडीच्यावतीने धुळे येथून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
माझ्यासोबत भाजपने धोकेबाजी केली, त्यामुळे मला हा पर्याय निवडावा लागला. मी आता आघाडीत आलो आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल त्या-त्या ठिकाणी आघाडीचा प्रचार करणार आहे, असे अनिल गोटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. जर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जावू शकतात, तर मी इकडे येऊ शकता नाही का? असा प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - महाआघाडीच्या 'शपथनाम्या'त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोटे यांचे जाहीर स्वागत केले. अनिल गोटे स्वाभिमानी असल्याने त्यांना भाजपमध्ये स्थान मिळाले नाही. मात्र, आम्ही त्यांना सन्मानपूर्वक स्थान देऊ, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.