मुंबई - 'आंदोलनजीवी' असे म्हणत आंदोलन करणाऱ्यांना हिणवणे योग्य नाही. खरंतर प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर हंडे आणि बांगड्या घेऊन भाजपनेसुद्धा आंदोलने केली आहेत. त्यामुळे 'आंदोलनजीवी' कोण हे ठरवायचे झाले, तर काटा हा भाजपकडेच झूकतो, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
आपल्या देशाला आंदोलने नवीन नाहीत -
आज जगभर आंदोलने होत आहेत. तसेच आपल्या देशालाही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती, त्यावेळी रोज काही ना काही असायचे, कुठे बांगड्या घेऊन जाणे, कुठे रिकामे हंडे घेऊन जाणे, रस्त्यातच बसणे अशा वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली जात होती. सभागृहातही त्यांनी आंदोलने केली. याची आठवणही छगन भुजबळ यांनी यावेळी करून दिली. लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल, तर पत्र पाठवायचे, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते मग याव्यतिरिक्त आणखी दुसरे काय करायचे, असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी विचारला.
अमित शाह यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार -
गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्गात भाषणात करताना, 'आपण बंद दाराआड काहीही करत नाही, जे काही करतो ते छाती ठोकून करतो', असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, मग रात्रीतून लोक उठायच्या आधी देवेंद्र फडणवीसांचा जो शपथविधी पार पडला, तो काय होता, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
मुख्यमंत्र्यांना भाजपकडून टार्गेट केले जाते -
भाजपचे नेते किरीट सोमैया हे मुख्यमंत्र्यांवर रोज नवीन आरोप करतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून काही न काही कारणावरून केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपतर्फे टार्गेट करण्यात येत असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
मोदींनी केली होती 'आंदोलनजीवी' ही टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत बोलताना देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयाला आल्याची टीका विरोधकांवर केली होती. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळावर शेतकरी नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून मोदींनी विरोधकांवर हा निशाणा साधला होता. ही आंदोलनजीवी जमात आंदोलनांशिवाय जगू शकत नाही. जिथे आंदोलन असते तिथे ही लोक जातात, अशी टीका मोदींनी केली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.