मुंबई - देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाच्या शहर असलेल्या मुंबईला सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवले आहे. तसेच काँग्रेसमधील कृपा शंकर सिंह यांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. याचा फायदा येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला होणार आहे. तर सत्ताधारी शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक
मुंबई महानगरपालिकेते गेले 25 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या काळात शिवसेना आणि भाजपा हे दोघेही मित्रपक्ष होते. 2014 मध्ये राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढले. या निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्येही महापौरपद शिवसेनेच्या वाटेला आले. त्यावेळी भाजपाने पहारेकऱ्याची भूमिका पार पाडू, कोणतेही पद घेणार नाही, पालिकेतील कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. भाजपाचा धोका ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडून शिवसेनेने त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले. अपक्ष नगरसेवक तसेच मनसेच्या नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेने आपले संख्याबळ 96 वर नेले आहे. ज्यांचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर असा महापालिकेचा नियम असल्याने शिवसेनेपेक्षा जास्त जागा भाजपाला मिळवाव्या लागणार आहेत. त्यासाठी पालिके निवडणुकीपूर्वी भाजप कामाला लागली आहे.
राजकीय परिस्थिती बदलली
राज्यातील राजकीय परिस्थिती 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बदलली आहे. एकेकाळी मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष कट्टर विरोधक झाले आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन राज्यात सत्ता मिळवली आहे. यामुळे शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी भाजपने मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेत असताना बेस्ट समिती अध्यक्ष, विधानसभेत विरोधी पक्ष नेते तसेच मुख्यमंत्री पद भूषविलेल्या नारायण राणे यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री पद भूषवलेले कृपा शंकर सिंह यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
राणे, सिंह यांचा भाजपला फायदा
नारायण राणे यांचा कोकणात दबदबा आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मुंबईमध्ये कोकणातील लोक मोठ्या संख्येने नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. कोकणातील लोकांच्या परेल, लालबाग, भांडूप, पवई, जोगेश्वरी, बोरिवली, कांदिवली चारकोप, दिंडोशी, मालाड, बोरिवली काजूपाडा, दहिसर कोकणी पाडा, गिरगांव आदी ठिकाणी वस्त्या आहेत. याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे. नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकणी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री पद भूषवलेले कृपा शंकर सिंह यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. कृपा शंकर सिंह यांचा उत्तर भारतीय मतदारांमध्ये चांगला प्रभाव आहे. सिंह यांच्या माध्यमातून उत्तर भारतीय मते भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.
सोशल इंजिनियरिंगने राज्य सरकारला चपराक
दोघांमुळे पक्षाला बळकटी येईल. कोकणी मते कोणाची मक्तेदारी कधीच राहिलेली नाही. विनोद तावडे, अॅड. आशिष शेलार, प्रमोद जठार, राजन तेली, प्रवीण दरेकर, प्रभाकर शिंदे, असे अनेक नेते भाजपकडे आहेत. हे नेते कोकणातील आहेत. शिवसेनेकडे कोकणातील किती नेते आहेत, अशी नावे सेनेला मोजावी लागतात. आज कोकणात भाजप घट्ट पाय रोवून उभी आहे. नारायण राणे यांच्यामुळे पक्षाला आणखी बळकटी आली आहे. आणखी वेगाने कार्यकर्ते काम करू शकतील. कृपा शंकर सिंह यांना मानणारा उत्तर भारतीय मोठा वर्ग आहे. उत्तर भारतीय मतदार हा नेहमीच भाजपकडे राहीला आहे. कृपा शंकर सिंह यांच्यामुळे आणखी शिक्कामोर्तब होईल. सामाजिक समीकरण म्हणजेच सोशल इंजिनियरिंगचे गणित भाजपने मांडले आहे. ओबीसींना आरक्षण देण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. केंद्र सरकारमध्ये 27 ओबीसी मंत्री बनवून राज्य सरकारला चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे.
हेही वाचा - भाजपकडून सुडाचे राजकारण सुरू, मात्र राज्यातली जनता हुशार - जयंत पाटील