मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्याला व्हॉट्सअॅपवरून शिवीगाळ करत मानायची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना मिश्रा यांच्याशी आपण कोणत्याही प्रकारचे अर्वाच्य अथवा अश्लील किंवा धमकावणारे संभाषण केलेले नाही. मिश्रा यांनी माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी खोटे चॅटिंग सादर केले आहे. मागील काही दिवसात माझ्यासह मुंबईच्या महापौरांवरही भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने खोटेनाटे आरोप केले जात आहेत. वेळ पडल्यास याबाबत आपण कायदेशीर कार्यवाही देखील करण्यास कचरणार नाही, असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्हॉट्सअॅपवर अर्वाच्य, अश्लिल संभाषण करून धमकावल्याचे आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केले आहेत. त्याबाबत स्पष्टीकरण जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले. याबाबत बोलताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांच्या हितासाठी तसेच मुंबई महानगराच्या विकासासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये सर्वांनी साथ द्यावी आणि गलिच्छ राजकारण करु नये, असे आवाहनही जाधव यांनी यानिमित्ताने केले आहे.
व्हॉट्सअॅप चॅटिंग खोटारडे -
जाधव यांनी यावेळी सांगितले, मिश्रा यांनी केलेले सर्व आरोप मी स्पष्टपणे नाकारतो आहे. मिश्रा यांनी सादर केलेले व्हॉट्सअॅप चॅटिंग खोटारडे आणि एडीट केलेले आहे. अन्य व्यक्तीच्या नंबरवर माझा डीपी लावून, तसेच माझे नाव सेव्ह करून ही बनावट चॅट तयार करण्यात आली आहे. शनिवारी केलेली चॅट दुसऱ्या दिवशी मी डिलीट केल्याचे मिश्रा यांचे म्हणणे हास्यास्पद तसेच त्यांचा खोटारडेपणा दर्शवणारे आहे. कारण व्हॉट्सअॅप चॅट ठराविक कालावधीतच डिलीट करावी लागते. दुसऱ्या दिवशी तसे करणे शक्यच नाही. मागील काही दिवसांमध्ये मिश्रा यांनी तसेच भारतीय जनता पक्षाने वैयक्तिकरित्या माझी तसेच मुंबईच्या महापौरांची देखील बदनामी करण्याचे कारस्थान सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून नव्याने माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
योग्य पद्धतीने निधी वितरीत -
जाधव पुढे म्हणाले की, नगरसेवकांना निधी वितरण असमान पद्धतीने केल्याचा मिश्रा यांचा आरोपही पोकळ आहे. स्थायी समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय नगरसेवकांना योग्य पद्धतीने निधी वितरीत करण्यात आला आहे. किंबहुना स्थायी समितीने मंजूर केलेल्या एकूण 700 कोटी रुपये निधींपैकी सुमारे 400 कोटी रुपये निधी, हा भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षाला देण्यात आला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटेला 173 कोटी रुपये आले आहेत. असे असताना मिश्रा यांना निधी मिळाला नसल्यास त्यांनी त्यांच्या पक्षाला जाब विचारावा, हे अधिक उत्तम, असेही जाधव पुढे म्हणाले.
हेही वाचा - राज्यातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांचे खांदेपालट
आरोप बिनबुडाचे -
खिचडी घोटाळ्यात मिश्रा यांच्यावर आरोप करताना त्यांनी या घोटाळ्यातून फ्लॅट खरेदी केला, असे मी कोठेही म्हटलेले नाही. कथित व्हॉट्सअॅप चॅटिंग तसेच घोटाळ्यातून फ्लॅट खरेदीचे आरोप करणे याविषयी मिश्रा यांना कुठेही तक्रार करण्याचे पर्याय खुले आहेत. माझी वैयक्तिक, महापौरांसह शिवसेना पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न त्यांनी बंद करावेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपला शिवसेनेने रोखून धरले. त्याच्या नैराश्यातून मागील काही दिवसांत त्यांनी आम्हाला बदनाम करण्याची मोहीम उघडली आहे. हे सर्वांना आता कळून चुकले आहे. भाजप तसेच मिश्रा हे करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
नियमाप्रमाणे प्रक्रिया -
प्रभाग क्रमांक 209 मध्ये जास्त निधी घेवून आणि अयोग्य रीतीने त्याचा वापर केल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना यशवंत जाधव म्हणाले की, माझ्या प्रभाग क्रमांक 209मध्ये महानगरपालिकेची विहित ई-निविदा प्रक्रिया राबवून गोरगरिबांसाठी निधीचा सदुपयोग केला आहे. बचत गटांसाठी भाजीपाला विक्री वाहन, गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई यंत्रांचे वाटप, गरजूंना व्यवसायासाठी झेरॉक्स संयंत्र, गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लॅपटॉप, सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त अशा ज्युट पिशव्या वितरण ही सर्व कामे नियमाप्रमाणे प्रक्रिया पार पाडून केली आहेत. धनदांडग्यांसाठी काम करणारा भारतीय जनता पक्ष हा गोरगरिबांसाठी काम करणाऱया शिवसेनेची जाणीवपूर्वक बदनामी करतो आहे. त्याचाच भाग म्हणून माझ्या प्रभागातील विकास कामांवर बोट ठेवले जात असले तरी त्या आरोपात देखील कोणतेही तथ्य नाही, अशी भूमिका जाधव यांनी मांडली आहे.