मुंबई : आज 16 आमदारांच्या अपत्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्याचवेळी एकेकाळी राज्याचे सत्ता केंद्र असलेल्या मातोश्रीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडली. ही घडामोड देशाच्या राजकारणातील महत्त्वाची आहे. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. नितेश कुमार आणि तेजस्वी यादव हे उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व नितीश कुमार यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत दिले.
लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र यावे : यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "बिहारचे लढवय्ये नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले आहेत. मी त्यांना लढवय्ये म्हणतोय यावरून तुम्हाला त्यांचा मातोश्रीवर येण्याचा हेतू कळला असेल. देशातले सध्याचे वातावरण पाहता लोकशाहीची हत्या होते की काय असे चित्र आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. यात विरोधी म्हणजे फक्त विरोधी म्हणून चालणार नाही, तर ज्यांना खरंच लोकशाही टिकवायची आहे, असे विरोधी पक्ष एकत्र यायला हवेत. अशा सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून लोकशाही बळकट करण्याची आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज नितीश कुमार मातोश्रीवर आले आहेत.
मीही जनतेसाठी लढतोय : आमच्या सोबत फक्त नेतेच नाहीत तर जनता देखील एकत्र येते आहे. पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, "आजच्या दिवसाला मी शुभ शकुन मानतो. कारण, आम्ही इतके दिवस सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निर्णयाची वाट पाहत होतो, तो निर्णय देखील आजच आला आणि नितेश कुमार जी तुम्हीदेखील आजच मातोश्रीवर आलेले आहात. या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आता आपल्याला काम करायचे आहे. मी देखील माझ्या स्वतःसाठी पक्षासाठी लढत नाहीये. तर, जनतेसाठी या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी लढतोय. भलेही या आधी आपले वाद असतील पण आता आपण एकत्र आलोय. हीच गोष्ट महत्त्वाची आहे.
देशाला एकजूट करायचे आहे: उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आज निर्णय आला हे चांगले झाले. पूर्ण देशाला एकत्र लढायचे आहे. देश स्वातंत्र कसा झाला आहे, सर्वांना माहीत आहे. देशाच्या हितासाठी देश एकत्र लढला पाहिजे. आम्ही अनेक पार्टी सोबत चर्चा करत आहोत. आता सर्वजण एकत्र येऊ. बैठक घेऊ याचा निर्णय लवकर घेऊ. संपूर्ण देशाला एकजूट करत पुढे जायचे आहे. ह्या एकजुटीला पुढच्या सर्व निवडणुकीत यश मिळेल."
हेही वाचा-
Asim Sarode On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते; जाणून घ्या, कसे?