मुंबई : राज्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी राज्यपालांच्या विधानभवनात शपथविधी सोहळा पार पडला होता. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसातच हे सरकार कोसळले होते. तेव्हापासूनच या शपथविधी सोहळ्याच्या चर्चा सुरू होती. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच केला होता. मात्र, माझा दुसऱ्यांदा विश्वासघात झाला, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
फडवणीसांचा गौप्यस्फोट: 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या वादातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती फिसकटली. यातच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र केवळ अडीच दिवस हे सरकार सत्तेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढल्यामुळे हे सरकार पडले. मात्र, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शरद पवारांसोबत चर्चा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर काही राजकीय समीकरणे फिरली आणि अजित पवार यांनी आपला पाठिंबा काढला. त्यामुळे यावेळी दुसऱ्यांदा आपला विश्वासघात झाला, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली फसवणूक ही आपल्या जिव्हारी लागली होती, ती फसवणूक आपल्यासाठी मोठी होती, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा मोह : अजित पवार आता नेहमीच पहाटेच्या शपथविधी बाबत बोलणे टाळतात. पत्रकारांनाही त्यांना याबाबत प्रश्न विचारल्यास ते उत्तर देत नाहीत. फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या सोबत स्वच्छ मनाने सरकार स्थापन केले होते. त्यांनी फसवणुकीच्या भावनेतून शपथ घेतली नव्हती. मात्र, नंतर त्यांना तोंडघशी पडावे लागले, असे अजित पवार यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांना त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा मोह होता. त्यामुळे त्यांनी युती तोडली. म्हणून आपण अजित पवार यांना सोबत घेऊन त्यावेळी सरकार स्थापन केले होते.
मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा नाही : 2019 च्या विधानसभा निवडणुका होण्याआधी कधीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर चर्चा केली नाही. अमित शहा यांची भेट झाल्यानंतर दोन दिवसाने केवळ पालघरच्या लोकसभा उमेदवारी बाबत चर्चा झाली होती. तो मतदार संघ आम्ही त्यांना दिला. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाकडून बंडखोर उभे राहिले होते. मात्र भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिलेल्या 90% बंडखोरांना मागे घातले. पण शिवसेनेने त्यांचे बंडखोर उमेदवार मागे घातले नाही, असे वक्तव्य देखील फडणवीसांनी केले आहे.
अजित पवारांवर टीका : आजारी असताना देखील नेत्यांना मतदानासाठी नेले जाते, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, अजित पवारांना काय प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे असे नेते आहेत की, जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मतदान करायला येतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यासारखे स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत, असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.
ब्राम्हण समाजाचे कौतुक : उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात विविध उद्योग, व्यवसायांमध्ये ब्राह्मण समाजातील तरुण, तरुणी उद्योजक म्हणून हिरीरिने काम करत आहेत. जगातील सात महत्वपूर्ण कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण समाजातील आहेत. गाव, खेडी, शहरी भागातून आर्थिक परिस्थितीवर मात करत पुढे येऊन उद्योग, व्यवसाय करत हा वर्ग पुढे जात आहे. अशा समाजातील नव उद्योगातील तरुण, तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ (बीबीएनजी) सारख्या संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा संस्थांची आता खूप गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी मार्गदर्शन करताना केले.
देशाच्या विकासास हातभार: मागील काही काळात नोकरी हाच ब्राह्मण समाजाचा पेशा होता. आता त्या पलिकडे जाऊन ब्राह्मण समाजातील मुले, मुली देशासह जगाच्या विविध भागात उद्योग, व्यवसाय करताना दिसतात. अनेकांनी आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे. विदेशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ब्राह्मण वर्गाची आघाडी आहे. भाकरवडीपासून ते मद्य निर्मिती क्षेत्रातील या वर्गाचा आवाका पाहिला तर मोठी क्षेत्रे ब्राह्मण उद्योजकांनी पादक्रांत केली आहेत. देशाच्या उद्योग तसेच अर्थव्यवस्था वाढीस हा वर्ग मोठा हातभार लावत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार मदत करणार: ते पुढे म्हणाले की, ज्या काळात लढाईची गरज होती त्यावेळी ब्राह्मण वर्ग तलवार घेऊन रणांगणावर उतरला. समाज सुधारणा करायची होती तेव्हा सुधारकाची भूमिका बजावली. अशा विविध सेवा क्षेत्रात ब्राह्मण वर्गाने मोठी कामगिरी केली आहे. या वर्गातील ज्येष्ठ ब्राह्मण उद्योजकांनी नव्याने उद्योगात पुढे येणाऱ्या ब्राह्मण समाजातील तरुणींना मार्गदर्शन, पाठिंबा देण्यासाठी बीबीएनजी सारख्या संस्था स्थापन करुन मोठे काम केले आहे. अशाप्रकारे अनेक समाज संस्था विविध भागात निस्वार्थीपणे कार्यरत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे फडणवीस म्हणाले. अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते पण शिक्षण, पैसा, मार्गदर्शन यांची त्यांना उणीव असते. ही उणीव बीबीएनजी सारख्या भरुन काढण्याचे काम करतात. या संस्था कधी काही शासनाकडे मागत नाहीत. त्या स्वयंभू आहेत. याचे कौतुक आहेत. पण सरकार म्हणून अशा संस्थांना गरजू व्यावसायिक, मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार संधी याविषयी काही साहाय्य हवे असेल तर ते नक्कीच आपण व्यक्तिश आणि सरकार म्हणून मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन उपस्थित फडणवीस यांनी दिले.
हेही वाचा : Pawar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे सभ्य नेते! 'त्या' खुलाशावर शरद पवारांची प्रतिक्रिया