मुंबई - व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची कुठलीही खातरजमा न करता मुंबई महानगरपालिकेच्या नावाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी सुरेश नाखूवा या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
काय आहे प्रकरण -
व्हॉट्सअॅपसारख्या समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून, एका जिवंत कोरोना संक्रमित रुग्णाला जाळण्यासाठी स्मशानभूमीत आणले असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरेश नाखूवा या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला. एक जिवंत माणूस महानगरपालिकेने स्मशानभूमीत जाळण्यासाठी आणला आहे, असे या व्यक्तीने लिहिले होते. त्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेने या व्यक्तीला संपर्क साधून, ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओबद्दल खातरजमा केली होती का? अशी विचारणा केली. या व्यक्तीने त्याबद्दल माहिती देण्यास नकार दिला होता. यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून केलेल्या चौकशीमध्ये हा व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले होे. महानगरपालिकेची विनाकारण बदनामी केल्याच्या कारणावरून आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 54 नुसार भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये महानगरपालिकेने तक्रार देऊन गुन्हा दाखल केला.
पोस्ट करणाऱ्याने मागितली माफी -
भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश नाखूवा या व्यक्तिची पोलिसांनी चौकशी केली. या व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओबद्दल जाहीर माफी मागितली आहे.