मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी माहिमच्या एका शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. या शिक्षकाने रांगोळी काढून लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. भारत गीते (रा. माहिम) असे या शिक्षकाचे नाव आहे.
कोरोना टाळण्यासाठी मास्क बांधा, गर्दी करू नका, स्वच्छता राखा तसेच हात स्वच्छ धुवा, असे सांगण्यात येत आहे. याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरातून बाहेर न पडणे. गीते यांनी रांगोळीतून घरातून बाहेर पडू नका, असा सल्ला दिला आहे. त्यांचा हा रांगोळी काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यांना सहकार्य करा, सरकारने आवाहन केल्यानुसार घरातच बसा आणि कोरोनाचा प्रसार रोखा, असे आवाहन गीते यांनी केले आहे.