मुंबई- दाटीवाटीची वस्ती असलेल्या भांडुप पश्चिम भागाला 'शट डाऊन' करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. झोपडपट्टी, चाळी असलेल्या या भागात कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन पाळला जात नव्हता. ईटिव्ही भारतनेही या बाबत वृत्त दिले होते. त्यांतर शट डाऊनचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा- Coronavirus : राज्य मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
कोरेनाचा प्रादुर्भाव मुंबईत दिवसागणीक वाढत आहे. लॉकडाऊन असताना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पूर्व उपनगरात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. भांडुपमध्ये भाजीपाला व इतर सामान घेण्यासाठी मोठी गर्दी होत होती. कोणतेही सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जात नव्हते. यामुळे भांडुप पश्चिम पूर्णपणे शटडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत या भागात शट डाऊन असणार आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. सकाळी 11 पर्यंत काही ठिकाणी गर्दी दिसून आली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी फेरफटका मारत लोकांना घरी जाण्याचे आवाहन केले. तसेच कोणतेही कारण नसताना दुचाकी वरुन फिरणाऱ्या 4 दुचाकी स्वारांवर भांडुप पोलिसांनी काल जप्तीची कारवाई केली. आजही अशाप्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. पूर्णतः शट डाऊन जाहीर करण्यात आले असून फक्त मेडिकलची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अगदीच आपत्कालीन परिस्थिती असल्यास बाहेर पडता येईल.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 14 वा दिवस आहे.