मुंबई - दलितांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी नवटकेंची एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांची बदली बीडवरून औरंगाबादला करण्यात आली होती.
क्लिप व्हायरल झाल्यानंतर आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली जात होती. त्यावेळी बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी अजूनही सुरू असून याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तरीही आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या बदल्यांमध्ये आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.
काय आहे त्या व्हायरल क्लिपमध्ये
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके मी गेल्या ६ महिन्यात २१ दलितांना फोडले आहे, मुस्लिमांना फोडलं आहे. माझ्या या कारवाईमुळे सगळ्यांना कडक मेसेज मिळाला आहे, की मॅडम कुणालाच सोडत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.