विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करा, राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र - कोरोना विषाणू
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुक आयोगाला निवडणुक जाहिर करण्याची विनंती करुन उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासाठी नकार दिला आहे.
मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, याची शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांना केली होती. त्यानंतर आज कोश्यारी यांनी निवडणूक जाहिर करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करणार नसल्याचेच संकेत दिले असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी २७ मे पर्यंत त्यांना दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहिर करण्याच्या पत्र लिहिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी एक प्रकारे नकार दिला असल्याचेच मानले जात आहे.
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कालावधी 24 एप्रिल रोजी संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच या रिक्त जागांसाठी निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. आता राज्य सरकारकडून ही निवडणूक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना शिवसेनेने पत्र दिले आहे. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनीही निवडणूक जाहिर करण्याची विनंती आयोगाला केली आहे.