मुंबई - बेस्ट कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने 'घरी राहा सुरक्षित राहा', असे म्हणत बस बंद करून 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा इशारा बेस्ट कामगार कृती समितीने दिला होता. मात्र, बेस्ट कामगारांनी कृती समितीचे आवाहन झुगारून घरी न राहता कामावर हजर राहणे पसंद केले आहे. बेस्ट सेवा सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना कृती समितीचे आवाहन झुगारल्यानंतर कृती समितीने एक पत्रक काढून कामगारांचे कौतुक केले आहे. कृती समितीने काढलेल्या पत्रात,अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्स त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे, या भूमिकेतून बेस्ट कामगारांनी 'घरी राहा सुरक्षित राहा' याचा अवलंब न करता कामावर उपस्थित राहिले. बेस्ट कामगारांनी आपले, आपल्या कुटुंबाचे हित न पाहता आपल्या देशाचे हित पाहिले. त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे कृती समितीचे सद्स्य शशांक राव यांनी म्हटले आहे.
बेस्टमधील 16 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 100 हून अधिक कोरोनाबाधित आणि 600 हून अधिक कर्मचारी क्वारंटाईन असतानाही कर्मचारी देशहिताला प्राधान्य देत कामावर हजर राहतात त्यांच कौतुक करावे तितके कमी आहे. राज्य सरकार मात्र गेले चार दिवस बघ्याची भूमिका घेत आहे, तर महापौरांनी बेस्ट कामगारांच्या जागी नवीन भरती करण्याची भाषा केली आहे, त्याचा राव यांनी निषेध केला आहे. राज्य सरकारने आता तरी बेस्ट कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असेही राव म्हणाले. बेस्ट कामगार कृती समिती यापुढेही कामगारांच्या प्रश्नावर लढत राहील, असे शशांक राव यांनी म्हटले आहे.
रोज प्रमाणे आजही कामगार हजर -
- 2754 पैकी 1202 बस (रस्त्यावर)
- 3444 पैकी 1213 कंडक्टर
- 3258 पैकी 1331 ड्रायव्हर
- 223 पैकी 98 निरीक्षक
- 220 पैकी 66 स्टार्टर