मुंबई: त्यातच बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने आपल्या खर्चात कपात केली आहे. त्यासाठी भाडेतत्त्वावर तसेच इलेक्ट्रिक बसेस घेण्यावर बेस्टने पुढाकार घेतला आहे. बेस्टच्या डेपोमध्ये असलेल्या जागांवर वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध करून त्यामधून महसूल मिळवला जात आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारून त्यामधून बेस्ट आपल्या महसुलात वाढ करणार आहे.
या ठिकाणी वाहने चार्जिंग करा: बेस्टने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १५ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन वरळी एनएससीआय, कुलाबा बॅकबे, मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, हिरानंदानी बस स्टॅन्ड, ताडदेव बस स्टेशन, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा पूर्व बस स्टेशन, माहीम बस स्टेशन, बांद्रा बस स्टेशन, गोरेगाव पश्चिम बस स्टेशन, सेवन बंगलो बस स्टेशन आणि वालकेश्वर बस स्टेशन या ठिकाणी उभारली जाणार आहेत. या ठिकाणी वाहन चालकांना इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग करता येणार आहेत.
५५ चार्जिंग स्टेशन उभारणार: मुंबईत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. त्यानंतर बेस्टने आपल्या डेपोच्या जागेवर चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. बेस्ट मार्च मध्ये १५ चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. लवकरच ५५ चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे. बेस्टच्या डेपोमध्ये प्रशस्त अशी जागा असून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारल्यास बेस्टला चांगला महसूल मिळणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंग: मुंबईत सध्या चार्जिंग स्टेशनची संख्या कमी आहे. यात आणखी वाढ केली जाणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबईतील गाड्यांची संख्या पाहता १५०० चार्जिंग स्टेशनची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार केले आहे. राज्यात मुंबई पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत नवीन खासगी इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंग तयार केले जाणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी एकूण वाहनतळाच्या २० टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्याचे ठरले आहे.
बेस्ट बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून ती नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहली आहे. मुंबईमधील प्रवासी लाखोंच्या संख्येने ट्रेन आणि बसने प्रवास करतात. बेस्टने ३० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईची द्वितीय लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या सुमारे ५० टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बेस्टच्या बसमध्ये याआधी दोन वेळा बॉम्ब ब्लास्ट झाले आहेत. त्यानंतरही बेस्टने प्रवाशांच्या सुरक्षेवर म्हणावे तसे लक्ष दिले नसल्याने लाखो प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.