मुंबई - कर्नाटकमधील आपल्या लोकांना खुश करण्यासाठी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकची आहे, असे विधान केले असल्याचा चिमटा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक संदर्भातील महाराष्ट्र सरकारची आपली भूमिका ठामपणे मांडली. विवादित भाग हा केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. तर मुंबईवर कर्नाटकचा अधिकार आहे, अशी मागणी जर कोणी करत असेल तर त्या मागणीत काही तारतम्य नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री यांनी कर्नाटकच्या लोकांना खुश करण्यासाठी ही भूमिका घेतली, असल्याचे पवार म्हणाले.
केंद्राने मध्यस्थीने तोडगा काढला गेला पाहिजे
दोन राज्यातील सीमाभागाबद्दल काही आक्षेप असले तर त्यात केंद्र सरकारने मध्यस्थी करणे गरजेचे असते. तसेच या प्रश्नावर ही तोडगा केंद्राने काढला पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. कर्नाटक सरकारने सीमा भागात फेर रचना करून कानडी गावं जाणूनबुजून मराठी भाषिक मतदार संघात टाकल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला.
काय म्हणाले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरागमना गावातील बसस्थानकाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बोलताना सवदी म्हणाले की, 'आम्ही मुंबई कर्नाटकचे आहोत. मुंबई आमची आहे. आमचा मुंबईवर अधिकार आहे. आम्ही त्याची मागणी करण्यास सुरूवात करू. कर्नाटकात मुंबई जोडावी यासाठीचा प्रस्ताव मी केंद्र सरकराकडे पाठवणार आहे.'
काय आहे सीमा वाद?
मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र बेळगाव, कारवार, निपाणीसह अनेक मराठी भाषिक गावांचा समावेश मात्र कर्नाटकमध्ये झाला. त्याला महाराष्ट्राने कडाडून विरोध करत या गावांवर दावा केला. कर्नाटकनेही हा भाग आपलाच असल्याचे सांगितले. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी भावना येथील जनतेमध्ये आहे. यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात नेहमीच खटके उडत असतात.
हेही वाचा - मुंबईवर कर्नाटकचा दावा, उपमुख्यमंत्री म्हणाले, 'मुंबई आमचीच'
हेही वाचा -