मुंबई - मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर गोवंडी येथे शुक्रवारी रात्री रेल्वे रूळ ओलांडताना एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता. ती व्यक्ती गोवंडी रेल्वे स्थानकावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या घराचा शोध घेतला असता त्याच्या झोपडीत चिल्लर पैसे आणि नोटांनी भरलेल्या काही गोण्या आढळून आल्या आहेत. यात लाखोंची चिल्लर, बँकेतील लाखोंची ठेवीची कागदपत्रे आढळून आली. मृत भिकाऱ्याचे नाव बीराबीचंद आझाद (वय 70 वर्षे) आहे.
हार्बर मार्गावरील गोवंडी रेल्वे स्थानका जवळच रेल्वे नाल्याच्या शेजारी एका झोपडीवजा घरात राहत असलेल्या पिरबीचंदचा रेल्वे रूळ ओलांडताना शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्याला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात देण्याच्या उद्देशाने त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. अपघात झालेल्या परिसरातच त्याची झोपडी असल्याचे प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचाच्या उपस्थितीत झोपडीमध्ये प्रवेश करत नातेवाईकांची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बँकेच्या ठेवीची कागदपत्रे सापडली. नाण्यांनी व नोटांनी भरलेली पोती मिळून आली आहेत. चिल्लरची रक्कम 1 लाख 50 हजार पेक्षा अधिक असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर ठेवीची रक्कम देखील 8 लाख 77 हजार रुपये आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.