मुंबई - केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात उद्या होणाऱ्या देशव्यापी संपात राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे शिक्षक हे सहभागी होणार असल्याने मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - "शिवसेनेची कामगार संघटना 8 जानेवारीच्या भारत बंदमध्ये होणार सहभागी"
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी राज्यातील तब्बल १६ लाख सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक हे सहभागी होणार असल्याची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकही अडचणीत सापडला असल्याने त्याविरोधात आम्ही उद्या संपात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.
मुंबई, ठाण्यातील अनुदानित आणि महापालिका शाळांसोबत ठाणेसह कोकणातील संपात सहभागी न होता, काळ्या फिती लावून या कामावर हजर राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी दिली. सरकारने या संपासाठी एक जीआर काढून कर्मचाऱ्यांना काम नाही तर वेतन नाही, असे आदेश काढला आहे. त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही या संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून निषेध करून आपले कामकाज सुरू ठेवणार असून राज्यातील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही यासाठी संघटनेकडून आवाहन करण्यात आले असल्याची माहिती घागस यांनी दिली.
राज्यातील प्राध्यापकांची प्रमुख संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमफुक्टो या संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे, यांनी सांगितले, की केंद्रातील मोदी सरकार विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणामुळे देशातील अनुदानित शिक्षण व्यवस्था आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील हजारो प्राध्यापक उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. साळवे म्हणाले.
हेही वाचा - 8 जानेवारीच्या देशव्यापी संपात मुंबईतील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता