मुंबई - घाटकोपर पश्चिमचे भाजपचे आमदार राम कदम यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी घाटकोपर पश्चिमच्या शिवसैनिकांनी राम कदमांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. 'साहेब आम्हाला माफ करा, यावेळी भाजपला मतदान करणार नाही', असे बॅनर आर सिटी मॉल समोरील चौकात लावले आहेत.
हेही वाचा - आमदार राम कदमांचे शक्तिप्रदर्शन, आज करणार उमेदवारी अर्ज दाखल
'माननीय उद्धव साहेब, जय महाराष्ट्र. किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी मिळू दिली नाही, तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला. महिलांचा अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी आपली ठाम भूमिका होती. पण, आज भाजपने युतीची घाटकोपरची उमेदवारी त्याला दिली आहे. साहेब माफ करा, यावेळी भाजपला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला असणार' असा मजकूर या बॅनरवर आहे. तसेच, खाली आपला घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक असा स्पष्ट उल्लेख आहे.
हे बॅनर शिवसेनेकडून लावले आहेत का, यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, शिवसैनिक मनसेला मदत करणार, असा उल्लेख असल्याने ही मनसेची खेळी असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, लावल्यानंतर काही वेळातच हे बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतले आहेत.