मुंबई - भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कंबोज हा बडोदा बँकेचा थकबाकीदार आहे. त्यांच्याविरोधात बँक ऑफ बडोदाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन मोहित कंबोज याचे नाव जाहीर केले आहे. मोहित कंबोज याने काही दिवसापूर्वी स्वतःचे आडनाव बदलून मोहित भारतीय करून घेतले होते.
मोहित कंबोज (भारतीय) याने बँकेचे कर्ज जाणीवपूर्वक थकवल्याची बँक ऑफ बडोदाची वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली असून या जाहिरातीत मोहित कंबोज याचा फोटोसह उल्लेख करण्यात आला आहे.
बँक ऑफ बडोदा या बँकेने जाहिरात देऊन त्यांच्या अनेकांना थकबाकीदार म्हणून जाहीर केले आहे. त्या यादीत भाजपच्या मोहित कंबोज याचा समावेश करण्यात आला असून त्याच्यासोबत त्याचे कंपनी भागीदार जितेंद्र कपूर यांचाही फोटोसह उल्लेख करण्यात आला आहे. ही यादी जाहीर करण्याची परवानगी बँकेने आरबीआयकडून घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज याने एक प्रसिद्धीपत्रक काढले असून याद्वारे मोहितने बँक ऑफ बडोदाच्याविरोधात येत्या 72 तासात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. मोहितच्या दाव्यानुसार 2014 मधील हे प्रकरण असून मेसर्स अव्यान ओर्नमेंट्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे कर्ज घेताना आपण प्रमोटर नव्हतो, तर वैयक्तिक जामीनदार असल्याचे त्याने म्हटले आहे. कर्ज मला देण्यात आले नसून संबंधित कंपनीला देण्यात आले असून वैयक्तिक जामीनदार असल्याने मी माझ्याकडून बँक ऑफ बडोदाला 76 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात माझ्या बाजूने निकाल आला असतानाही बँकेने माझा फोटो छापून मानहानी केल्याने मी बँकेच्याविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे मोहित कंबोज याने स्पष्ट केले आहे.