मुंबई- बँक विलिनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाने विरोध दर्शवला तर डाव्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकांचे होत असणारे विलिनीकरण आणि बँकांनी घटवलेले व्याजदर या मुद्यांना विरोध करण्यासाठी शहारातील आझाद मैदान येथे आज संप पुकारण्यात आला आहे.
या संपात मुंबईतील आझाद मैदान येथे बँक कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी आहेत. त्यामुळे सार्वजनिक बँकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलिनीकरण करून ४ मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होईल. तर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहबाद बँकेचे इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकचे युनियन बँकेत विलिनीकरण होणार आहे. या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ विविध धरणे आंदोलन करण्यात आले आहेत. संपूर्ण देशभरातून विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध सुरू आहे. तरी देखील सरकार त्यावर दाद देत नाही. त्यामुळे यापूर्वी देखील दोन वेळा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आंदोलन, संप पुकारून निषेध नोंदविला होता. त्याच शृंखलेत आज देखील संप पुकारण्यात आला व निषेध करण्यात आला आहे.
हेही वाचा- इकबाल मिर्चीचा हस्तक हुमायून मर्चंटला ईडीकडून अटक, प्रफुल पटेलांच्या अडचणीत वाढ