मुंबई - काँग्रेसच्या 53 आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले जाणार आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच संगमनेर मध्ये असलेल्या अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च देखील बाळासाहेब थोरात उचलणार आहेत.
राज्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण केले जाईल. यासंबंधीचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या मोहिमेसाठी राज्यावर जवळपास साडे सहा हजार कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यात काँग्रेसचे विधानसभा आणि विधानपरिषेदेतील मिळून 53 आमदार असून या आमदारांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला जाणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. शिवाय स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपला एक वर्षाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात महसूली तूट होत आहे. अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे कराच्या माध्यमातून राज्य सरकारला येणारा पैसा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे राज्यावर लसीकरणाच्या खर्चाचा मोठा भार पडणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारचा लसीकरणाला प्राधान्य असून यासाठी लागणारा साडेसहा हजार कोटीचा खर्च करण्यासाठी राज्य सरकार प्राथमिकता देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात उचलणार अमृत उद्योग समूहाच्या लसीकरणाचा खर्च
संगमनेर तालुक्यात असलेला बाळासाहेब थोरात यांच्या मालकीच्या अमृत समूहात जवळपास साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च स्वतः बाळासाहेब थोरात उचलणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.