मुंबई: कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. आताच राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले. सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. या निवडणुकीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा वाद रंगला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर आपले जमत नसल्याचे सांगत बाळासाहेब थोरात टोकाची भूमिका घेण्याच्या प्रतीक्षेत आहे. काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे व त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे या दोघा पिता पुत्रांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या मसुदा समितीमध्ये बाळासाहेब थोरात यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांच्या जखमेवर एका प्रकारे मीठ चोळण्याचे कामच काँग्रेसने केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मसुदा समितीत अनेक नेत्यांचा समावेश: यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मिलिंद देवरा अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे. पण यातील एकाही समिती किंवा उपसमूहामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ वक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मसुदा समितीचे सदस्य : अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण,
राजकीय व्यवहार : अशोक चव्हाण, आरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर
आर्थिक घडामोडी उपसमूह: मिलिंद देवरा, प्रणिती शिंदे, नितीन राऊत
शेतकरी आणि कृषी उपसमूह: नाना पटोले
सामाजिक न्याय व अधिकार उपसमूह: मुकुल वासनिक- अध्यक्ष, शिवाजीराव मोघे, विजय वडेट्टीवार,
युवा, शिक्षण आणि रोजगार उपसमूह : वर्षा एकनाथ गायकवाड
थोरात यांची नाराजगी दूर करण्याचे प्रयत्न : राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फारच उलथापाल झाली आहे. सत्यजीत तांबे अपक्ष निवडून आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलें विरोधात नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे दिला. त्यांनी तसे पत्र लिहून नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील हे उद्या मुंबईत येणार आहे. ते बाळासाहेब थोरात यांची भेट सुद्धा घेणार आहेत. त्यानंतर पक्ष कार्यकरणीची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर रोष व्यक्त केल्याने त्यांचे नाव वगळले आहे की तब्येतीच्या कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : Mumbai Crime: दुचाकी चालकाच्या डिक्कीत सापडले दागिने आणि रोख रक्कम; वाहनचालकास अटक