मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरित मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसने देशव्यापी चालवलेल्या ऑनलाईन मोहीम ‘स्पीक अप इंडिया’ला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोहोचेल. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि या घटकांना मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
आज (गुरुवार) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चालवलेल्या या ऑनलाईन मोहिमेत राज्यातील मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने ट्विटर, फेसबूक, यू-ट्यूब, इन्स्टाग्रामवरून या मोहिमेत सहभाग घेतला. गरिबांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करावेत व पुढील 6 महिने प्रतिमहा ७ हजार ५०० रुपये द्यावेत, स्थलांतरीत मजुरांना सुखरुप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी, तसेच मनरेगातर्फे २०० दिवसांचा रोजगार द्यावा, या मागण्या या स्पीक अप इंडिया कॅम्पेनच्या माध्यमातून केल्या आहेत.
देश सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून लॉकडाऊनमुळे कामगार, गरिब, हातावर पोट असलेले, शेतकरी, लघु उद्योजकांना मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या राष्ट्रीय संकटात केंद्र सरकारने सढळ हाताने मदत करुन पीडित घटकांना आधार देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसने ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहीम राबवली. सामान्य जनतेचा हा आवाज केंद्र सरकारचे कान नक्की उघडेल असे थोरात म्हणाले. ‘स्पीक अप इंडिया’ या ऑनलाईन मोहिमेत सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.