मुंबई - राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पूरामुळे 16 नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, भयंकर दुष्काळातून कसेबसे सावरत असताना राज्यावर पूराचे संकट ओढावले आहे. मुंबई, कोकणासह, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीला पूर आल्याने नाशिक शहरासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कोल्हापूर शहराला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. गावे पाण्यात बुडाली आहेत. गृहोपयोगी सामान वाहून गेले आहे. पुरामुळे पिकांची मोठी नासाडी झाली असून पशुधन संकटात सापडले आहे. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे उद्धवस्त झाले असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यात्रा काढून मतांचा जोगवा मागण्यात व्यस्त आहेत.
पूर परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सरकारी यंत्रणेच्या मदतीपासून बहुतांशी नागरिक दूर आहेत. अनेक भागात स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच मदत आणि बचावकार्य करत आहेत. पुरामुळे अनेक भागात पिण्याचे शुद्ध पाणीही लोकांना मिळत नाही, ही परिस्थिती आहे. ज्या भागात पूराचे पाणी ओसरू लागले आहे, त्या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अशा संकटकाळात सरकारकडून युद्धपातळीवर मदतकार्याची लोकांची अपेक्षा आहे. पण, अनेक ठिकाणी प्रशासनाची मदत पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने या अभूतपूर्व पूरस्थितीवर मात करण्यासाठी व लोकांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी थोरात यांनी केली.
यापूर्वीही राज्यावर जेव्हा संकटे आली, तेव्हा त्यावेळच्या सरकारांनी अशा बैठका बोलावून सर्वांशी विचारविनिमय करून मदत कार्य गतिमान केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. या संकटकाळातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्ष पूर्णपणे सरकारला मदत करायला तयार आहे. सरकारनेही आपण सगळे करतोय तेवढेच पुरेसे आहे किंवा योग्य आहे, असा समज करून न घेता सर्वांशी चर्चा करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.