मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचितच्या फॅक्टरमुळे आम्हाला नुकसान झाले, हे सत्यच आहे. ते आम्ही नाकारत नाही. मात्र, आता धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन धर्मांधशक्ती विरोधात विधानसभेसाठी निवडणूक लढवणे, यासाठी अनेक पक्ष संघटनांचे एकमत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे. त्यात अनेक सकारात्मक विषय समोर आले आहेत. त्यामुळे आता केवळ एकत्र बसून उर्वरित विषय सोडवणे शिल्लक राहिले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून रंगवले जात आहे. त्याला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही दुजोरा देत सकारात्मक चर्चा होत असून ते आघाडीसोबत येतील, असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना थोरात म्हणाले, की आम्ही राज्यात विभागनिहाय बैठक घेणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. त्यातच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. गुरूवारी नवी मुंबईमध्ये कोकण विभागाची बैठक आहे. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत चढउतार असतात, असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.
पुन्हा एकदा काँग्रेस भरारी घेईल -
ज्या प्रकारे काँग्रेसने १९८० मध्ये भरारी घेतली होती, तशीच भरारी पुन्हा एकदा काँग्रेस घेईल, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अर्ज करत असल्याचे थोरात म्हणाले.
भाजप पक्ष आहे का बकासूर?
ऑपरेशन लोटसवर विचारले असता, ते म्हणाले, देशातील जनतेने भाजपला केंद्रात चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांना बहुमत मिळवून दिले आहे. तरी ही भाजपची भूक काही कमी होत नाही. म्हणूनच भाजप पक्ष आहे का बकासूर? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.