मुंबई - आज आपण दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या या पाठिंब्यामुळे नक्कीच त्यांना दिलासा मिळेल, त्यांच्या लढ्याला बळ मिळेल. आपण आणि आपले शेतकरी 60 दिवस लढत आहेत, पण सरकार एक-दोन लोकांच्या हितासाठी काम करत असून त्यांना शेतकरी दिसत नाही. तेव्हा यावरून हे सरकार भांडवलदारांचे गुलाम आहे, हेच स्पष्ट होत असल्याचे म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही - शरद पवार
केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर सर्वांनाच याचा फटका
नव्या काळ्या कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे, देशभरातील शेतकरी या विरोधात लढत आहेत. कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत शेतकरी लढत राहील. शेतकऱ्यांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची गरज आहे. कारण, या कायद्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहेच, पण सर्वसामान्यही यात भरडले जाणार आहेत. कारण व्यापारी शेतकऱ्यांकडून स्वस्त धान्य घेतील व तोच धान्य आपल्याला महागात विकतील. त्यामुळे, ही बाब लक्षात घ्या आणि शेतकऱ्यांसोबत उभे रहा, असे आवाहन थोरात यांनी केले.
राज्यात शेतकरी हिताचेच कायदे पास करणार
केंद्राचे शेतकरी विरोधी काळे कायदे राज्यात लागू केले जाणार नाही, अशी भूमिका या आधीच राज्य सरकारने घेतली आहे. तर, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली, त्या समितीच्या काही बैठका झाल्या आहेत. त्यानुसार आम्ही राज्यात शेतकरी विरोधातील कोणतेही कायदे पास करणार नाही. आम्ही जे कोणते कायदे पास करू ते शेतकरी हिताचेच असेल, असे आश्वासन थोरात यांनी दिले.
हेही वाचा - किसान मोर्चासाठी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज