मुंबई - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून पूर परिस्थिती गंभीर झाली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांचे लक्ष नव्हते, अशावेळी जनतेने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्यांच्यावर दमदाटी करणे आणि जमावबंदीचा आदेश लागू करणे हे चुकीचे आहे. याचा सरकारला जाब द्यावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
सांगली, कोल्हापूर भागात जनता संकटात सापडली होती. या संकटाच्यावेळी पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात उपस्थित नव्हते. अशा स्थितीत एकीकडे पालकमंत्री, सरकारी यंत्रणा उशीरा आल्यावर जनतेला राग येणारच. यामुळे जनतेने प्रश्न विचारला म्हणून त्यांना 'गप्प बस', अशी दमदाटी करणे हे सरकारच्या मंत्र्यांना शोभत नसल्याचीही टीका थोरात यांनी केली.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली पाहिजे. सरकारच्या विरोधात पूरग्रस्त जनतेमध्ये रोष आहे. तो नियंत्रीत करण्यासाठी जमावबंदी लावणे चूकीचे आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र रोष उत्पन्न होईल. सरकारने या गोष्टी न करता लोकांना मदत करावी आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली.