मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांच्या पाठीमागे कोणाचे हात आहेत? हे स्पष्ट दिसत आहे. सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झाला आहे, असे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर प्रहार केला. सत्तेसाठी राक्षसी प्रवृत्ती असलेला भाजप आता देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत असल्याचे थोरात म्हणाले.
जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेला हल्ला हा लोकशाही व संविधानावर करण्यात आलेला हल्ला आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे थोरात म्हणाले. रात्रीच्या अंधारात हल्ला करुन भाजप विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे. भाजप विद्यार्थी संघटनेच्या गुंडानी हा हल्ला केला त्यावेळी पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सरकारच्या पाठिंब्याशिवाय असा हल्ला होणे शक्य नसल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेस पक्ष अशा हिंसक कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून, हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही थोरात यांनी केली.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी १५ दिवसापूर्वी अमानुष मारहाण केली होती. विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणे ही हुकूमशाही प्रवृत्तीच आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाचे भविष्य उध्वस्त करण्याचा भाजपचा हा डाव आहे. यामध्ये त्यांना यश येणार नसल्याचे थोरात म्हणाले.