मुंबई Balasaheb Thackeray Death Anniversary : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर दादरच्या शिवतीर्थावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन मोठा वाद झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे शिवतीर्थावर प्रचंड तणाव निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवतीर्थावर शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात : सध्या दादरच्या शिवतीर्थावर शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत आहेत. मात्र, संभाव्य तणावाची परिस्थिती लक्षात घेता परिमंडळ पाचचे उपायुक्त मनोज पाटील यांनी "कोणीही कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल." अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या या भागात बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह 300 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अकरा वाजेपर्यंत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.
गुरुवारी रात्री झाला शिवतिर्थावर राडा : गुरुवारी रात्री शिवतीर्थावर ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे पोलिसांनी शिवतीर्थावर तगडा बदोबस्त तैनात केला आहे. पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गुरुवारी रात्री निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सध्या सुरू आहे. आता या भागातील वातावरण शांत असून आम्ही इथं बॅरिकेटिंग केलेलं आहे. ज्या शिवसैनिकांना या पवित्र स्थळाचे दर्शन घ्यायचं असेल, त्यांनी रांगेमध्ये यावे आणि स्मृती स्थळाचे दर्शन घ्यावे. मात्र, कोणीही इथं वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल"असं उपायुक्त मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :
- गद्दारांच्या छातीवर पाय रोवणारे बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देत सामनामधून शिंदे गटावर निशाणा
- बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
- Balasaheb Thackeray Death Anniversary: व्यंगचित्रकार ते हिंदुत्त्वाचा बुलंद आवाज! 'असा' राहिला बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास