मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून मानहानीकारक वक्तव्य केल्यामुळे सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. याच मुद्द्यावरून काल लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात येते.
पुण्यात बॅनर झळकावले: काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आली होती. परंतु त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत राहुल गांधी यांना एक न्याय व बच्चू कडू यांना एक न्याय अशा आशयाचे पुण्यात बॅनर झळकावले आहेत. यावरून बच्चू कडू यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे.
बॅनर लावलेले कार्यकर्ते अति उत्साही: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविषयी चर्चा रंगू लागली आहे. व ही शिक्षा पंधरा दिवसापूर्वीच सुनावली गेली असल्याने त्यावर जास्तच चर्चा रंगली आहे. याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, माझ्या विरुद्ध बॅनर लावलेले कार्यकर्ते अति उत्साही आहेत. मी केलेले आंदोलन हे स्वत:साठी नव्हते. ते मी अंपग बांधवांसाठी केले. मला दोन गुन्ह्यात एक एक वर्ष शिक्षा झाली आहे. पण याची माहिती घेत नसल्यामुळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागे आहेत. माझी आमदारकी गेली तरी मी आनंद साजरा करेन. ३५३ चा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. हा कायदा आम्हीच चुकीच्या पद्धतीने आणला आहे.आपल्याकडे कायदे केले जातात मात्र त्याची अमंलबजावणी होत नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
घाई करण्याची गरज नव्हती: पुढे बच्चू कडू म्हणाले की, बीजेपी आपला हात मारून चालली आहे. राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई केली एवढी घाई करण्याची काही गरज नव्हती. अशी घाई सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. आतापर्यंत एवढ्या फाईल पेंडिंग आहेत त्यावर कारवाई होत नाही. मंत्रालयातून सरकार चालते ते विधानभवनातून सरकार चालावे. विधान भवनाच्या बाजूला जी खाऊ गल्ली आहे त्या ठिकाणाहून ५०० रुपये हप्ता घेतात. माझ्या स्वतःवर ३५० गुन्हे दाखल आहेत. बाकीचे आयुष्य जेलमध्ये जाईल की सांगता येत नाही. पण मी जे आंदोलन केलेले आहे ते अपंग दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी केलेले आहेत.
काय आहे प्रकरण?: ८ मार्च २०२३ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली. बच्चू कडू यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अधिकाऱ्यांबरोबर दमदाटी केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनाविण्यात आली होती. सन २०१७ मध्ये दिव्यांग कल्याण निधी खर्च न केल्यामुळे दिव्यांगांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये बच्चू कडू सुद्धा सहभागी झाले होते. याबाबत विचारणा करण्यासाठी बच्चू कडू हे नाशिक महापालिकेत आयुक्ताच्या दालनात गेले असता, त्यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर बच्चू कडू हे धावून गेले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्याविरोधात सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे, दमदाटी करणे यासाठी गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा खटला सत्र न्यायालयात चालल्यानंतर बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरवले व दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.