मुंबई : मुंबईतील दादर येथील गोकुळदास पास्ता लेनमध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावना आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा छापखाना आपल्याला त्यांच्या पत्रकारितेची आणि समाजाला जागृत करण्यासाठी नियतकालिकांच्या असलेल्या उपयुक्ततेची साक्ष देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छापखाना आजही सुरू असून या छापखान्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचे साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले त्यांचे शेवटचे नियतकालिक प्रबुद्ध भारत आजही अव्यहातपणे सुरू आहे अशी माहिती त्यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी दिली.
1920 मध्ये बाबासाहेबांचा मूकनायक : निद्रिस्त असलेल्या समाजाला जर जागृती आणायची असेल तर त्याच्या पर्यंत पोहोचले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली पाहिजे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य विचार होता आणि म्हणूनच प्रबोधनाच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये पहिले पाक्षिक मूकनायक सुरू केले. मूकनायक या पक्षिकाच्या माध्यमातून समाजापर्यंत स्वातंत्र्याचे आणि समतेचे विचार पेरण्याचे काम बाबासाहेबांनी केले मात्र हे पाक्षिक फार काळ टिकले नाही याचे केवळ 13 अंकच प्रकाशित करता आले. 1920 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले आणि हे पाक्षिक बंद पडल्याचे भीमराव आंबेडकर सांगतात.
1927 मध्ये बहिष्कृत भारत : लंडनमधून आणखी उच्च शिक्षण घेऊन परत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे आत्मभान जागवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न बहिष्कृत भारत या नियतकालिकाच्या माध्यमातून केला. मात्र बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती त्यांना छपाईसाठी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी छापखाना कामाठीपुरा परळ या भागातून विविध छापखान्यांमधून नियतकालिक छापून घेतले. 1933 पर्यंत त्यांनी बहिष्कृत भारत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही फारसे येताना दिसत नव्हते म्हणून त्यांनी बहिष्कृत भारत केवळ 33 अंकांनंतर बंद केले.
छत्रपती शाहू महाराजांकडून मदत : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा भेट घेतल्यानंतर त्यांना आपल्या कार्याविषयी आणि प्रकाशन विषयी माहिती दिली. स्वतःचा छापखाना नसल्यामुळे येत असलेल्या अडचणी त्यांनी महाराजां पुढे मांडल्या. छत्रपती शाहू महाराजांनी ताबडतोब या कामासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्याकाळी सत्तावीसशे रुपये आर्थिक मदत केली. या मदतीचा जोरावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जनता हे मासिक सुरू केले हे मासिक 1951 पर्यंत सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांनी दिलेल्या पैशातून भारत भूषण हा छापखाना सुरू केला होता.
प्रबुद्ध भारत अखेरचे प्रकाशन : बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारताना आणि संपूर्ण समाज हा समतेच्या आधारावर स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित व्हावा, तो शहाणा व्हावा प्रबुद्ध व्हावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 नंतर प्रबुद्ध भारत हे नियतकालिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या छापखान्याचे नाव बदलून बुद्धभूषण असे केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या या नियतकालिकांमधून तत्कालीन पिचलेल्या, मागास समाजाला सातत्याने प्रेरणादायी विचार, समतेच्या विचार मिळत गेले. त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना होत गेली. हे अतिशय मोलाचे कार्य बाबासाहेबांच्या प्रकाशानांमधून झाल्याची माहिती भिमराव आंबेडकर यांनी दिली.