मुंबई - स्वमग्नता अर्थात ऑटिझम असलेल्या व्यक्तिच्या कार्यक्षमतेवर कुणालाही शंकाच येईल. मात्र, मुंबईतील 11 वर्षीय जिया राय हिने हा समज खोटा ठरवला आहे. जियाने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर ३ तास २७ मिनिटे ३० सेकंदांत पोहून पार करत विक्रमाची नोंद केली. जियाला ऑटिझम आहे तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे.
नौदल अधिकारी मदन राय आणि अर्चना राय यांची मुलगी असलेली जिया कुलाब्यातील नौदल शाळेत सहावीत शिकते. तिला बोलताही येत नाही. ऑटिझम असताना देखील कमी वयातील जलतरण पटू म्हणून ती ओळख मिळवत आहे. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' साठी ती पात्र ठरली आहे. काही दिवसातच तिच्या नाव अधिकृतरित्या नोंद होईल, अशी माहिती तिचे वडील मदन राय यांनी दिली.
हेही वाचा - हॉकीची 'राणी' : ही आहे भारताची 'सुवर्णकन्या' राणी रामपाल
जियाला ऑटिझम असल्याने ती पोहू शकणार नाही, असे स्विमिंग शिकवणाऱ्या प्रशिक्षकांनी आणि लोकांनी तिच्या पालकांना सांगितले. मात्र, तिच्या पालकांनी मुलीची आवड लक्षात घेऊन जियाला पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. जियासारख्या विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तिने बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
जिया अडीच वर्षांची असताना तिला ऑटिझमचा आजार असल्याचे लक्षात आले. ऑटिझममुळे तिचे वजनही खूप वाढत होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिला पोहायला शिकवा, असा सल्ला दिला. सुरुवातीला हा निर्णय खूप अवघड वाटला. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिने पोहायला सुरुवात केली त्यानंतर आठ वर्षांतच तिने पोहण्यात अनेक विक्रम केले. जियाच हे यश पाहून लोकांची मानसिकता बदलायला हवी अशा भावना तिची आई अर्चना यांनी व्यक्त केली.