मुंबई - मराठी चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांनी छोट्या पडद्यावरील एका विनोदी कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अखेर परचुरे यांनी या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे.
'पु.ल. देशपांडे यांनी लिलिलेली बापू काणे ही व्यक्तिरेखा सादर करणे हाच माझा त्यामागील उद्देश होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पुण्यशोक अहिल्याबाई होळकर या आम्हाला वंदनीय आहेत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असं परचुरे यांनी म्हटले आहे.'
'अतुल परचुरे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करणार नाहीत'
दरम्यान या प्रकरणावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अतुल परचुरे यांना मी व्यक्तिश: ओळखतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ते जाणीवपूर्वक अपमान करणार नाहीत, याबद्दल माल पूर्ण खात्री आहे. परचुरे यांनी केवळ पु.ल. देशपांडे यांचे लेखन सादर केले. मात्र तरी देखील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे हा विषय आता इथेच थांबवावा अशी मी विनंती करतो असं खोपकर यांनी म्हटले आहे. तसेच सध्याचा काळ खूप कठीण आहे, या कठीण काळात एकमेंकांच्या साथीने आपण अहिल्यादेवी यांच्या स्वप्नातील आदर्श राष्ट्रनिर्माण करूया असे आवाहन देखील यावेळी खोपकर यांनी केले आहे.
हेही वाचा - ऑक्सिजनसाठी केंद्राने राज्याला दिलेला निधी कुठे गेला? भाजप आमदाराची चौकशीची मागणी