मुंबई : मोहसीन अब्दुल कादिर सालेमन आणि अलेशिष एन्जेला फर्नाडिस नावाचे दोन प्रवाशी, आबूधाबी येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी त्यांचे पोर्तुगीज पासपोर्ट, पोर्तुगीज देशाचे सिटीझनशीप कार्ड आणि बोर्डिंग पासेससह इतर दस्तावेज दाखविले होते. ते दोघेही आबूधाबी येथून आयर्लंड येथे जाणार होते. या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर मोहसीन सालेमन या व्यक्तीला लुक आऊट नोटीसवर ठेवण्यात आल्याचे इमिग्रेशन अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
कार्ड देण्याचे दिले आश्वासन : चौकशीअंती त्यांचे खरे नाव मालदेवभाई मोघवाडिया आणि हिरल मोघवाडिया असल्याचे उघडकीस आले. २०१८ साली ते दोघेही लंडन येथे गेले होते. तिथे त्यांनी काही महिने काम केल्यानंतर ते एका गुजराती एजंटच्या संपर्कात आले होते. या एजंटने त्यांना २५ हजार ब्रिटीश पौंडच्या बदल्यात पोर्तुगीज देशाचा पासपोर्ट व सिटीझनशीप कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याच्यासोबत ते दोघेही लिस्बन येथे गेले होते. तिथे त्याने या दोघांचे दोन वेगवेगळ्या नावाचे बोगस पासपोर्ट बनविले. याच पासपोर्टवर त्यांनी दोन वेळा भारत-पोर्तुगीज आणि पुन्हा भारतात प्रवास केला होता.
बोगस भारतीय व्हिसाचा वापर : जून महिन्यात मुंबईत आल्यानंतर १२ जुलैला ते दोघेही पुन्हा आयर्लंडला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी बोगस भारतीय व्हिसाचा वापर केला होता. अशा प्रकारे या दोघांनी बोगस दस्तावेज सादर करुन, पोर्तुगीज देशाचे पासपोर्ट आणि सिटीझनशीप मिळवून फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली होती. त्यामुळे या दोघांनाही पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -
- Mumbai Crime News : डार्कनेटच्या सहाय्याने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड, एक कोटींच्या ड्रग्स जप्तीसह एका नायजेरियन व्यक्तीस अटक
- Mumbai Crime: बनावट व्हिसा देऊन अनेकांना पाठविले विदेशात, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
- Henley Passport Index 2023 : जपानचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली, भारताचा क्रमांक 85 वा ; जाणून घ्या पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय?