मुंबई : राज्यात राजकीय नेत्यांना धमक्या व हल्ले या घटनांमध्ये वाढ होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अल्ताफ पेवेकर हे सात बंगला मेट्रो स्टेशनच्या जवळून जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. गाडीची काच फोडून अज्ञात व्यक्ती पळून गेले. या दरम्यान अल्ताफ पेवेकर यांना थोडी दुखापत झाली आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर आरोप : ही घटना सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली आहे. अल्ताफ हे गाडीतून घरी, वर्सोवाच्या दिशेने जात होते. अचानक चेहऱ्याला कपडा बांधून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी बॅटने त्यांच्या गाडीची काच फोडली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप पेवेकर यांनी केला आहे. घटनेनंतर अल्ताफ पेवेकर यांनी पोलिसात धाव घेतली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय नेत्यांवर हल्ला : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सुरुंग लावल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अनेकदा आमनेसामने आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाहनावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना देखील घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 10 जूनच्या रात्री साडेसात वाजता मेहकर फाटा परिसरात ही घटना घडली होती. अज्ञात रेती माफियांनी लोखंडी रॉडने त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या समोरील काचा फुटल्या होत्या. सप्टेंबर 2022 मध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी हल्लेखोरांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. त्यापूर्वी उदय सामंत याच्या गाडीवरही पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली होती.
हेही वाचा :