मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टंपने तीन मार्चला हल्ला झाला. मॉर्निंग वॉक करत असताना हा हल्ला झाला. हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात खंडणी विरोधी पथकाने आता तिसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विकास चवरिया असे या आरोपीचे नाव असून त्याचा हल्ल्याच्या कटात सहभाग होता.
फेमस होण्यासाठी संदीप देशपांडेंवर हल्ल्या : समाजात आपले नाव मोठे करण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याची कबुली गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अशोक खरात याने गुन्हे शाखेच्या चौकशीत दिली आहे. मात्र, अशोक खरात हा नव्वदीच्या दशकापासून गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याने त्याने मुंबई गुन्हे शाखेकडे नोंदवलेला जबाब न पटणारा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे खंडणी विरोधी पथक अशोक खरात याच्याकडे कसून चौकशी करत आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष असलेला अशोक खरात याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरोधात खंडणी, अपहरण आणि खुनाचे प्रयत्न असे अनेक गुन्हे भांडुप आणि डोंबिवली परिसरात नोंद असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हल्ला प्रकरणात तिसरी अटक : खरात याच्यासोबत गुन्ह्याच्या कटात चवरिया हा सामील असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने त्याला भांडूपमधून ताब्यात घेत अटक केली आहे. शिवाजी पार्क परीसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या देशपांडे यांच्यावर गेट क्रमांक 5 जवळ तीन ते चार जणांनी बॅट आणि स्टंम्पने हल्ला केला होता. शुक्रवारी सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटिव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासत अन्य तांत्रिक पुरावे आणि खबर्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. भांडूपमधील रहिवासी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल सेनेचा उपाध्यक्ष अशोक खरात (56) याचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच गुन्हे शाखेने त्याला आणि त्याचा साथीदार किशन सोलंकी (35) याला ताब्यात घेतले. त्यांना अटक केली आहे. त्यानंतर आता विकास चवरिया या आरोपीची तिसरी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.