मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या माटुंगा येथील 'राजगृहा'तील कुंड्यांची व काचांची अज्ञाताकडून मंगळवारी (दि. 7 जुलै) सायंकाळच्या सुमारास तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेले 'राजगृह' या निवासस्थानाला आंबेडकरी जनतेत एक विशेष भावनिक स्थान आहे. या राजगृहाल भेटी देण्यासाठी सध्या टाळेबंदीचा कालावधी सोडल्यास दररोज अनेकजण येत असतात. 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी अनुयायी राजगृह पाहण्यासाठी गर्दी करतात. राजगृहात झालेल्या तोडफोडीच्या घटनेने आंबेडकरी समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
समाजकंटकांनी राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचीही तोडफोड केली. घराच्या काचांवरही दगडफेक केली. घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी सांगितले. हल्ला झाला त्यावेळी मिराताई, आनंदराज आणि भीमराव आंबेडकर राजगृहावर होते. पावसामुळे हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
हेही वाचा - पर्यटन कंपन्यांची मनमानी; रद्द झालेल्या परदेशवारीचे पैसे न देण्यासाठी नवी शक्कल