मुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्राच्या काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, कर्नाटक सरकारला जशास तसे उत्तर दिले जावे अशी भूमिका राजकीय नेत्यांकडून मांडण्यात येत आहे. कर्नाटकामध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी या मुद्द्यावर आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन त्यांना अभिवादन केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या वाहनावर अशा प्रकारे हल्ला करणे योग्य नाही. या सर्व घटनेचा आपण निषेध करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.
आम्ही काम करत राहू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामदास आठवले यांनी चैत्यभूमी येथे येऊन अभिवादन केले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला प्रेरणा दिली आहे. त्या प्रेरणेतूनच आज आम्ही काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न अजून पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आम्ही काम करत राहू असही ते यावेळी म्हणाले आहेत.
सीमावाद चिघळला, महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक: महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा याचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. पुणे बंगलोर महामार्गावर ही दगडफेक झाली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसैनिक सुद्धा आता या संतप्त प्रकरणानंतर आक्रमक होत असून आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे गट आक्रमक: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. बेळगावात मंगळवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. बऱ्याच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता. बेळगावातील या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुण्यात कर्नाटकच्या चार बसेसना काळे फासले आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बसना कार्यकर्त्यांनी काळे फासून बेळगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.