मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पळवापळवीच्या राजकारणाने तर कहरच केला आहे. त्यामुळे अशावेळी नक्कीच जुन्या एकनिष्ठ नेत्यांची नक्कीच आठवण येत असणार. त्यातीलच एक 'मासबेस नेता' अर्थात आर आर पाटील उर्फ आबा..
हेही वाचा - जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंच्या पदरात नेमकं काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. त्यात राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप आहेत. अशावेळी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शरद पवार ऐन ऐंशीतही पायाला भिंगरी लावल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर, दुसरीकडे भाजप, शिवसेना अगदी दिल्लीतील नेतेही एकट्या शरद पवारांवर टीकेची झोड उठवीत आहेत. अशावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढे येवून याला प्रत्युत्तर देणे गरजेचे असताना मात्र, तसे काहीच होताना सध्या दिसत नाही. अशा वेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला उणीव जाणवते ती आर. आर. पाटील यांची. जर आबा असते तर ते सत्ताधारी भाजप शिवसेना नेत्यांवर तुटून पडले असते. आला अंगावर घेतले शिंगावर, या उक्तीप्रमाणे जशास तसे उत्तर त्यांनी दिले असते. या आधीही सभागृहात आणि सभागृहाबाहेर आबांनी विरोधकांना अंगावर घेतल्याचे अनेक प्रसंग सर्वांनाच माहित आहेत. त्यांच्या या आक्रमक स्वभावामुळेच ते लक्षात रहातात. या कारणानेच त्यांची उणीव राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच भासत आहे. पडझडीच्या काळात साथ सोडून गेलेल्या नेत्यांना तर आबांनी चांगलेच फैलावर घेतले असते. आबांच्या वक्तृत्व शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला मोहळ घातली होती. त्यांच्या सभांना सर्वांकडून मागणी होत असे. ते आज जर असते तर तेच प्रचारात आघाडीवर असते. शरद पवारांना या वयात जी मेहनत घ्यावी लागत आहे तेवढी त्यांच्या उपस्थित घ्यावी लागली नसती असे राजकीय विश्लेषक सांगतात.
हेही वाचा - फडणवीसांसाठी जनादेश...लोकांसाठी मात्र 'जनरोष यात्रा'?
खरे 'आबा' -
सत्तेच्या खुर्चीवर राहूनही आपले पाय जमिनीवर ठेवणारी आणि आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. अशा नेत्यांच्या यादीत आर. आर. पाटील ऊर्फ आबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
सांगली जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या तासगाव तालुक्यात जन्मलेल्या आबांची जिल्हा परिषद सदस्यापासून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. संघर्षातून मिळालेले यश डोक्यात न जाऊ देता हा नेता कायम मातीत आणि माणसांमध्येच राहिला. त्यामुळेच सत्तास्थानावर असूनही आर. आर. पाटील या नावापेक्षा ‘आबा’ म्हणूनच ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते ठरले.
हेही वाचा - शरद पवारांची एक रॅली अन् सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर ?
आबांचा राजकीय प्रवास -
आबांचे वडील सरपंच असले, तरी घरची परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. सांगलीमध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये ‘कमवा शिका योजने’तून आबांनी शिक्षण घेतले. अत्यंत साधे कपडे, पायात स्लिपर, कॉलेजला जाताना हातात एक-दोन वह्या घेऊन आर. आर. जायचे. आबांमध्ये वक्तृत्वगुण होते. वक्तृत्व स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून शिक्षणाचा थोडाफार खर्च भागायचा. अशाच परिस्थितीत आबांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संपतराव माने यांच्या घरी ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागायला यायचे. तिकीट मिळाले अन् ते निवडूनही आले मग त्यांनी ११ वर्षे जिल्हा परिषद गाजवली. वसंतदादा पाटील यांचे बोट धरून आबांनी राज्याच्या राजकारणात घौडदौड सुरू केली. पुढे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून आबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणाला झाली. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे प्रथम जिल्हा परिषद, नंतर विधानसभेतही गाजली. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून त्यांचा गौरवही झाला. अभ्यासू आमदार, उत्कृष्ट वक्ता म्हणून सर्वत्र त्यांचा नावलौकिक होता.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव
बी.ए. आणि एल.एल.बीचे शिक्षण घेतलेले आर.आर. पाटील सांगली जिल्हा परिषदेचे १९७९ ते १९९० या काळात सदस्य होते. अतिशय सामान्य घरातून आलेले आबा पहिल्यांदा २००४ ला उपमुख्यमंत्री झाले. तासगाव मतदारसंघातून ते १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१५ ला निवडून आले. मुंबईत नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा गृहमंत्री झाले. आघाडी सरकारच्या काळात ते नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.
आबा कायम शरद पवारांसोबतच -
राज्यात सभा गाजवणाऱ्या नेत्यांमध्ये आबा आघाडीवर होते. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रचारासाठी शरद पवार यांना वेळ नसेल, त्यावेळी कार्यकर्ते ‘आबां’ना पाठवा म्हणून आग्रह धरत. राज्यातील कानाकोपऱ्यातून त्यांच्या सभांची मागणी असे. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही सभा जिंकणारी नेते मंडळी अचानक जग सोडून गेली. त्यानंतर आबाही जाऊन बसले. त्यामुळे त्यांची उणीव सद्याच्या राजकारण्यांना जाणवत असेल हे नक्की.
आबांची अंग -
गोरगरिबांची दु:खे समजून घेणारा नेता, अत्यंत साध्या राहणीचा, सदैव जनतेच्या हाकेला ओ देणारा नेता, तितकाच संवेदनशील, मितभाषी आणि तितकाच हजरजबाबी, अशी आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
भष्ट्राचाराचा आरोप नसलेले आबा -
राजकारणात जवळपास चाळीस वर्षे काम करूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. शरद पवार यांनी जवळपास दहा वर्षे राज्याच्या गृहखात्याची आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आबांकडे सोपवली होती. त्यातच पवारांचा आबांवरील विश्वास अधोरेखीत होतो. विविध पक्षांच्या नेत्यांवर तोफा डागणारे अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यासारखे नेतेही आबांच्या निवडणूक प्रचाराला आले होते. त्यावरुनच आबांचा साधेपणा आणि सच्चेपणा दिसून येतो.
एखादा माणूस जिवंत असला की, त्याची किंमत समाजाला कळत नाही. आबांचे तसेच आहे. राज्याच्या राजकारणात आबा नाहीत ही कल्पना करणेच जड जाणारे आहे. त्यामुळे आबा नाहीत हे पचवण्यासाठी मला खूप काळ लागेल असे खुद्द शरद पवार म्हणाले होते.
अत्यंत साधी राहणी हेच त्यांचे वेगळेपण होते. म्हणूनच सर्व स्तरातील लोकांना ते भावले, त्यामुळे सध्याच्या राजकारणात त्यांच्यासारखा साधसरळ व सच्चा नेता शोधणे तसे जडच जाणारे असेल हे मात्र नक्की.त्यामुळे हेच सर्व कारणे आहेत ज्यामुळे आबांची आज उणीव नक्कीच भासत असणार.