मुंबई - वायफायच्या माध्यमातातून ईव्हीएममशीन हॅक केल्या जाऊ शकतात. त्यामुळे ज्या स्ट्राँग रूममध्ये इव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. त्या परिसरात मोबाईल जॅमर लावावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्यांची मुंबईत आज पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
मतमोजणी बाबत बोलताना चव्हाण म्हणाले, ईव्हीएम मशीनसोबत कोणी छेडछाड करू नये, मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम मशीन टेम्पर होऊ शकतात. तसेच ज्यावेळी मतमोजणी सुरू होईल, त्यावेळीही जामर सुरू ठेवावेत. निकालाच्या वेळी मेन सर्व्हरवर टाकण्यापूर्वी मेन शीटवर आरोची सही घेल्याशिवाय पुढील मतमोजणी करू नये, अशीही मागणी काँग्रसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
त्याशिवाय ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी व्हावी. तसेच उमेदवार म्हणतील त्याच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी आणि शेवटच्या उमेदवाराची पहिली मोजणी केली जावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती चव्हाणांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेसच्या या मागणीवर आयोगाने आम्ही मुख्य निवडणूक आयुक्ताला कळवतो, असे आश्वासन दिले असल्याचेही चव्हाणांनी यावेळी सांगितले.