मुंबई - संपूर्ण देश मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला विसरलेला नाहीत. दहशतवादाच्या विरोधात मुंबईसह महाराष्ट्र नेहमीच उभे राहिला आहे. तरीही भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह हिला उमेदवारी दिली आहे. यावरून भाजपची देशभक्ती किती पोकळ आहे हे दाखवून दिले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी निरुपम रोड शोमध्ये ते सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
चौथ्या टप्प्यात मुंबईच्या ६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे आता मुंबईच्या दिशेने वाहू लागले आहेत. आज उत्तर पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जोगेश्वरी भागात शक्ती प्रदर्शन केले. संजय निरुपम जिंदाबादच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
एकीकडे राष्ट्रवाद आणि देशभक्ती दाखवायची आणि दुसरीकडे शहिद हेमंत करकरेंसारख्या एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर चुकीचे विधान करत शहीदांचा अपमान करायचा, असे घाणेरडे राजकारण भाजपकडून केले जात आहे. वीर जवानांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देणे, यावरून भाजपची भूमिका स्पष्ट झालेली आहे. भाजपला आम्ही उघडे पाडणार आहोत, असा इशारा चव्हाण यांनी दिला. संजय निरुपम हे एक फायटर आहेत. मुंबईतील वातावरण हे काँग्रेससाठी पोषक आहे, असेही ते म्हणाले. लोकांना खोटारडेपणाचा कंटाळा आला आहे. अच्छे दिनचे आश्वासन ते विसरले आहेत. जनतेला कळून चुकले की आपल्याला फसवले जात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.