मुंबई- भाजपच्या नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अत्यंत मनमिळावू आणि संवेदनशील मनाच्या महिला नेत्या होत्या. आपली तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी केवळ माझ्या आग्रहाखातर मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शब्द दिला आणि त्या आल्या होत्या. त्यांचे ते मुंबईतील अखेरचेच भाषण ठरले. परंतु, हे भाषण आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सुषमा स्वराज यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
मुंबईत आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी षण्मुखानंद सभागृहात महिला मेळावा आयोजित केला होता. त्या महिला मेळाव्याला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. आपली तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी या मेळाव्याला येणाऱ्या महिलांच्या अडचणी होणार नाहीत म्हणून त्या कोणत्या वेळात घ्याव्यात याची सुद्धा काळजी त्यांनी घेतली होती. सायंकाळी महिलांना घरातील कामे असतात, तर सकाळी वेगळी धावपळ असते. यामुळे त्यांनी हा महिला मेळावा दुपारच्या वेळात घेण्यासाठी मला सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या तब्येतीची पर्वा न करता दिल्लीहून आल्या आणि या मेळाव्यात मार्गदर्शन करत देशात पुन्हा आपली सत्ता येईल हे त्यांनी ठासून सांगितले. त्यानंतर देशात अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यांचे भाषण संपल्यानंतर काही वेळातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे त्यांना फार काळ थांबता आले नाही. त्यामुळे त्यांची ही सभा मुंबईतील आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शेवटची सभा ठरली.
सुषमा स्वराज यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या माझ्यासारख्या अनेक पदाधिकाऱ्यांना पाठीवर थाप देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले होते. मी भाजपाचा मुंबई प्रदेश अध्यक्ष असताना उभे केलेले महिलांचे संघटन पाहून त्यांनी यासाठीचे गौरवोद्गारही अनेकदा काढले होते. मुंबईतील त्यांच्या अखेरच्या भाषणात त्यांनी देशातील महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात आणि महिलांच्या हक्कासंदर्भात केलेले मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी ठरले.त्यांनी आपल्या भाषणात मुंबईतील महिलांना मोठी प्रेरणा दिली होती. आपली तब्येत बरी नसतानाही त्यांचे ते भाषण त्यांचा तो उत्साह पाहून आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली होती असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.